इनबॉक्स मधील नातं – CONNECTION FROM INBOX

 

मी नव्यानेच ट्विटरवर दाखल झालो होतो. थोडं फार लिहू लागलो होतो. फॉलोवर्स कमी होते. अगदी दोन आकडी संख्या. थोडं बाहेरच्या जगाशी, विचारवंतांच्या सानिध्यात राहायची सवय म्हणून ट्विटर वर दाखल झालो होतो. थोडंफार स्वतःचे पण विचार मांडण्याची सवय होती. हा पण मी काही महान विचार मांडत नव्हतो किंवा मांडतही नाही आणि माझी तेवढी लायकी पण नाही. असंच मनाने मनाच्या खुषालीसाठी सारं आपलं. त्यात एक दिवशी अचानक एका आकर्षक चेहऱ्याचा DP असलेल्या हँडलने मला फॉलो केलं होतं. मी जाऊन ते हँडल चेक केलं. ती मुलगी होती, तिचा फोटो पहावा नि कोणीही तिच्या प्रेमात पडावं. अर्थात तिचा डीपी पाहून मी सुद्धा भूललो. ती मोजक्याच लोकांना फॉलो करत होती. मोठे सेलेब्रिटी सोडले तर सामान्य मी & अजून एखादं दोन जणांना ती फॉलो करत होती. ‘ती’ आपल्याला फॉलो करतेय खरं. पण हीच जर आभासी जगातून आपल्या वास्तवी जगात आली. तर मज्जा येईल. असं मला पहिल्यांदाच मनोमन वाटलं. माझी स्वप्नयात्रा सुरू झाली. तिचा डीपी पहावा आणि तिला फॉलो द्यावा. हे माझ्या मनाला न पटणारं होतं. तीचं लिखाण कसं आहे हे पाहणं गरजेचं होतं. ती ट्विटरवर नवीन होती. त्यामुळे तिचा ट्विटरचा वापर फार कमी होता. हे मला तेव्हा कळालं जेव्हा मी तिच्या ट्विटर हँडलला रोज चोरुन भेट द्यायचो आठवडाभर मी तिच्या हँडलला रोज भेट देत राहिलो. काही दिसतंच नव्हतं. अर्थात ती ट्विटर वापरत नव्हती. आठवडा उलटून गेला मी वाट पाहत होतो. आज येईल, उद्या येईल पण पदरी पडली नेहमीप्रमाणे निराशा. शेवटी थकलो आता तिच्या हँडलकडे ढुंकुनही पहायचं नाही. हे मी मनाशी ठरवलं होतं. इतक्यात एक नोटिफिकेशन वाजलं. तसा मी मोबाईल चेहऱ्यासमोर धरला. एक मेसेज माझ्या इनबॉक्स मध्ये येऊन धडकला होता. पाहतो तर काय? तिचा मेसेज मला आला होता. माझी एक चारोळी तिने मला पाठवली होती. तुझी ही चारोळी माझ्या आयुष्यातील फार जवळच्या घटनेशी निगडित आहे. असा तिचा मेसेज होता. आपण पावसाची चातकासारखी वाट पहावी. आणि पाऊस अलगद येऊन आपल्याला चिंब भिजवून जावा. असं काही व्हावं अशी माझी अवस्था त्यावेळी झाली होती. तिच्या मेसेजला मी काय उत्तर द्यावं? ह्यासाठी विचार करण्यात माझा साधारण एक तास गेला होता. इतकं सगळं करून मी फक्त ‘ ठीक आहे ‘ इतकचं उत्तर दिलं. यानंतर माझ्या मेसेजला तिचा रिप्लाय आलाचं नाही. पुढे काही दिवस ती माझ्या चारोळ्या लाईक करत राहिली. आणि मग तिने तीचं लिखाण सुरू केलं. अगदी भुवया उंचवावं असं लिखाण नव्हतं तीचं. पण ठीक ठाक लिहीत होती. तिच्या लिखाणात दुःख स्पष्टपणे झळकतं होतं. ते काल्पनिक नव्हतं. तर वेदनेतून येत होतं. मी तिच्या टाईमलाईनवर लक्ष ठेवून होतो. तिचं लिखाण मला बैचेन करणारं होतं. थोडं अस्वस्थ करणारं होतं. कोण जाणे पण ते वाचलं की मनाला रुखरुख लागलेली असायची. म्हंटल तिच्याशी बोलावं तर मेसेज मध्ये ती फक्त तिला माझी आवडलेली चारोळी पाठवायची आणि मी ‘ठीक आहे’ धन्यवाद इतकंच काय ते संभाषण. मी तिच्या बोलण्याची वाट पाहत राहिलो आणि ती माझ्या बोलण्याची. यातच ३ महिने निघून गेले. दिनक्रम बदलला नव्हता आणि मेसेजेस सुदधा बदलले नव्हते. यानंतर अचानक ती ट्विटरवरून गायब झाली. जवळपास १५ दिवस झाले. तिची टाईमलाईन सुनीसुनी होती. आणि माझा इनबॉक्स सुद्धा रिकामाच. मी १५ दिवस वाट पाहत राहिलो. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ती ट्विटरवर नव्हती. २,३ दिवसाने अचानक तिचा मेसेज आला. मी थोडा खुश झालो चला परतली एकदाची. अस मनास वाटलं. आणि मेसेज मध्ये काय असेल? म्हंटल माझीचं एखादी चारोळी. त्यात नवीन काय? पण इथे मी चुकलो होतो. आज मेसेज मध्ये चारोळी नव्हती. ती थेट गप्पा झाडू लागली थोडक्यात भांडू लागली होती. १५ दिवस मी ट्विटरवर नव्हते. तू साधा एक मेसेज नाही केलास मला? इतका निर्दयी कसा आहेस रे तू? स्वार्थी आहेस तू? चारोळीची स्तुती ऐकणारा, आणि फक्त ‘ठीक आहे’ धन्यवाद बोलणारा. दगड आहेस तू असं ती म्हणाली. मला काय बोलावं ते कळेना. कधीही न बोलणारी ही आज इतक्या आगतिकतेने का बोलत आहे? हे मला कळलंच नाही. मी कशीबशी तिची समजूत काढली. थोडं खोटं खोटं तिला सॉरी म्हणालो. मग ती शांत झाली. मग तिने मला सांगितलं मी सुद्धा १५ दिवस गायब नव्हते. इथेच होते. फक्त टाईमलाईन शांत ठेवली होती. गेल्या १५ दिवसातल्या तुझ्या चारोळ्या फारच वेदनादायी होत्या. गेल्या १५ दिवसातल्या तुझ्या सगळ्या चारोळ्या मी लपून वाचल्या आहेत. त्या माझ्यावरचं होत्या ना? कल्पनिकतेच्या नावाखाली तू वास्तविक लिखाण करतोस ना?
तिच्या या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. मी वेळ मारून नेत विषय बदलला. पुढे चॅटिंग सुरू झालं. रोज मोठे मोठे मेसेजेस एकमेकांना समर्पित होऊ लागले. एकमेकांच्या खाजगी आयुष्याबद्दल विचारणा होऊ लागली. एकमेकांची आवड-निवड जुळतेय का पाहणं सुरू झालं. जे जे एका निखळ निर्मळ मैत्रीत होतं. ते सगळं ट्विटरच्या एक छोट्याशा मेसेज बॉक्स मध्ये सुरू होतं. आजपर्यत आमच्या आयुष्यात तुझ्या सारखी व्यक्ती आलीच नाही. असं आम्हां दोघांकडूनही एकमेकांना शिक्कामोर्तब झालं होतं. २४ तासातले १५ तास तरी आमचं चॅटिंग सुरू असायचं. स्वभाव जुळल्यामुळे विषयांची कमतरता नव्हतीच. पुढे ४ महिने असेच गेले. आता गोष्ट एकमेकांना ऐकायची होती. तिला वाटलं हा मुलगा आहे याने आधी नंबर मागायला हवा. आणि मला वाटायचं तिने आधी नंबर मागायला हवा. आमच्या इगोमुळे आम्ही दोघेही एकमेकांकडे नंबर मागू शकलो नाही. दोघांनाही एकमेकांचा मोबाईल नंबर हवा होता. पण आधी मागणार कोण? यावरून सगळं बिघडलं होतं. बघता बघता दिवस सरत होते. दोघांनाही एकमेकांचा आवाज ऐकायचा होता. पण कोंडी सुटत नव्हती. तिनेच अखेरीस मेसेज करून हिंमत करून तिनेच मला मोबाईल नंबर मागितला. मी आनंदने नाचू लागलो. १५,२० मिनिटे झाली. मी तिला रिप्लाय केला नाही. ती वाट पाहत होती. १५,२० मिनिटाने मी भानावर आलो. मी कसा देणार तिला मोबाईल नंबर तिला? कसा ऐकवणार माझा आवाज??
मी तर जन्मतः ‘ मुका ‘ माझे शब्द कसे फोनवरून पोहोचतील तिच्या कानी? आभासी जगात हरवलेला मी. माझा आवाज जिवंत आहे सांगू शकतो. वास्तवात माझ्या मुक्या आवाजाची किंमत शून्य आहे. भानावर येऊन भरल्या डोळ्याने, हुंदके देत तिला मी मेसेज केला. हे बघ मी तुला नंबर देऊ शकणार नाही. त्यासाठी माझी काही खाजगी कारणे आहेत. त्यामुळे तू मला समजून घे. माझ्या अशा गर्वाने भरलेल्या मेसेजने तिचा इगो दुखावला. मी तिची फसवणूक करतोय असं तिला वाटलं. त्या रात्री मेसेज बॉक्स मध्ये ती मला नको नको ते बोलत राहिली. मी गुपचुप ऐकत राहिलो. उशी तोंडावर घेऊन अश्रू झाकत राहिलो. देवाकडे याचना करत राहिलो देवा पुढच्या जन्मी तरी “मला माझा आवाज दे”
रात्र सरली दुसऱ्या दिवशी तिच्या टाईमलाईनवर गेलो. तीचं हँडल दिसत नव्हतं. ती ट्विटर सोडून कायमची गेली होती. हे पाहून मला जबर धक्का बसला होता. फुलण्यापूर्वीच एका नात्याचा अंत झाला होता.. ती नसेल तर माझा काय उपयोग आहे?
मी सुद्धा माझं ट्विटर हँडल त्यादिवशीच कायमसाठी डिलीट केलं ..
*समाप्त*
*(काल्पनिक_कथा)*
*( टीप- सदर कथा काल्पनिक असून मी मुका नाही देवाच्या कृपेने मला बोलता येतं )*
*#shubya*

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s